Breaking News
मुंबई : होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. रविवारी होळी असल्याने नागरिकांना वृक्षतोड न करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. कुणीही बेकायदा वृक्षतोड करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबत पोलिस तक्रार करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
तसेच होळीच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास पालिका अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. महापालिकेच्या १९१६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’नुसार कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा अपराध आहे.
वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
ROHAN RASAL