Breaking News
आरक्षणाच्या मुद्द्यावरून कडूंचा हल्ला
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी (13 डिसेंबर) मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणा संदर्भातील 293 च्या प्रस्तावावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सर्वच पक्षातील नेत्यांवर टीकास्त्र डागले. त्यांनी जातीपातीच्या नावावर राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवू नका असे म्हणत जर एवढे जातीवदी लोक सभागृहात काम करत असतील तर या सभागृहाचे पावित्र्य कसे राखले जाईल असे म्हणत नेत्यांचे कान टोचले.
पुढे बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, जातीपेक्षा हक्कापेक्षा हक्काची लढाई महत्वाची असते. शेतकऱ्यांना त्यांचा भाव मिळत नाही, मजुरांना मजुरी मिळत नाही. शेतकऱ्यांना जर भाव मिळाला तर सगळं प्रश्न मिटतील. परंतू शेतकऱ्यांसाठी 75 वर्षांत कोणताच पक्ष काहीच करू शकत नाही हे दाखवून दिले. शेतकऱ्यांसाठी कुणीच उभं राहत नाही. माझ्यावर 350 गुन्हे दाखल झाले. 4 ते 5 गुन्ह्यात मला कोर्टाने पाच- पाच वर्षांची शिक्षा सुनावली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून असे होणे माझ्यासाठी काही नवीन नाही असेसुद्धा यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले.
पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, जन्म झाला की, माणसाला जात आणि धर्म चिकटतो. तो मरेपर्यत कायम राहतो. जात सोडू नका, पण जातीवर वाद करू नका, जात कुणीच सोडली नाही पाहीजे. तशी तर जात ही विष आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी जात हे विषच आहे. ज्या मजुरांने हे सभागृह बांधलं त्याला 100 रोज होता. तर इंजिनिअरांना 800 रुपये. ही लुटीचे तंत्र आहे. जो जास्त कष्ट करेल त्याला लुटायचे. जो कमी मेहनत करेल त्याला जास्त दिल्या गेले. श्रीमंतानी अधिक श्रीमंत व्हावं आणि गरीबांनी अधिक गरीब व्हावं. मग गरिबाने श्रीमंताच्या घरी भांडी घासावी ही व्यवस्था आहे. आता व्यवस्थेला तोडण्याची ताकद आपल्या नाही म्हणून या व्यवस्थेपर्यंत आपण आलोय. आणि त्यावर आपली पोळी भाजायची आहे. असाही टोला बच्चू कडू यांनी सभागृहातील नेत्यांना लगावला.
प्रस्तावावर बोलताना कडू म्हणाले की, आरक्षणावरून नेते मोठे होणार आणि कार्यकर्ते संपून जाणार आहे. मोठे- मोठे नेते द्वेष पसरविणारे भाषणं करत असतील कसं होईल. अरे बाबासाहेबांनी स्वतःच्या शरीरात कधी जात शिरू दिली नाही. ते म्हणाले होते की, मी आधीही भारतीय आणि नंतरही भारतीय आहे. आणि याच महापुरुषांना आपण जातीपातीत अडकवत आहोत. पेटवून दिले पाहीजे सगळ्यांना खरं तर. बाबासाहेबांचा पहिला पुतळा एका मराठ्याने उभारला याचा गर्व आहे. महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली. जातीपातीचे बंधन तोडत त्यांनी सुरुवात केली. असा हा महाराष्ट्र होता. पण आता तसे राहले नाही. काही सभा मी ऐकल्या त्यामध्ये एकजण म्हणतो 160 आमदांरांना आम्ही पाडू, ही काय भाषा आहे. एका मोठ्या नेत्यांने असं बोलण ठीक आहे का? एखाद्या कार्यकर्त्यांने बोललं असतं तर समजू शकलो असतो. एकमेकांवर आरोप करा पण समाजावर, जातीवर बोलाल तर राख होऊन जाईल ना सगळं, मग कोण थांबवेल हे. आपण समजदार लोकांनी जातीवर बोललो तर महाराष्ट्र बेचिराख होईल अशी भीतीसुद्धा बच्चू कडू यांनी यावेळी बोलून दाखवली.
सध्या विविध सभांमधून मराठा म्हणजे अन्याय करणारी जमात उभी करून ठेवली. असं चित्र निर्माण करणं चुकीचे होईल. राजकारण तर होईल पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका, अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा, घरं जाळणाऱ्यांचे हातपाय तोडून टाका, ती घटना निषेधार्हच आहे. पण या सभागृहात कोणीच मराठा मुलांच्या आत्महत्येवर बोलला नाही याचा खेद आहे. 50 मराठा मुलांनी आत्महत्या केल्या. त्याचा उल्लेख कुणी केला नाही. योगेश नावाचा पोरगा पीएच. डी. झालेला होता. त्याच्या बापाने आत्महत्या केली होती, घर पडकं होतं. शिकून, शिकून नोकरी लागत नाही म्हणून त्याने आरक्षणाचा आधार पकडला. पण तेही मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. मराठवाड्यात पिकांना भाव मिळत नाही. सगळ्याच शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्या भागात त्याकडेही सरकारने लक्ष दिले पाहीजे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times