Breaking News
नवी दिल्ली – संसदेची सुरक्षा भेदून दोन युवकांनी लोकसभेच्या कार्यवाहीदरम्यान सभागृहात घुसखोरी केली आहे. या दोघांनीही प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात प्रवेश केला. संसदेतील उपस्थित खासदारांनी सांगितल्यानुसार दोन्ही युवकांच्या हातात टियर गॅसचे कॅन होते. या दोघांनाही खासदारांनी पकडले आणि सुरक्ष रक्षकांच्या हवाली करण्यात आले. या गोंधळामुळे संसदेचे कामकाज दुपारी दोन वाजता पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास घेऊन दोन्ही युवक संसदेत आले होते. त्यांनी प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उडी घेतली आणि स्मोक कँडल फोडली. यामुळे लोकसभेत धूर झाला आणि गोंधळ उडाला. यातील एक तरुण मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. त्याचे नाव अमोल शिंदे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोघांचा ससंदेत घुसण्याचा उद्देश अजून समोर आलेला नाही.
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, दोन युवकांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी घेतली. आणि त्यांनी काही तरी फेकले ज्यामधून गॅस निघायला लागला. त्यांना खासदारांनी तातडीने पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात देण्यात आले. सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजता पर्यंत तहकूब केले गेले आहे. सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. सुरक्षेत चूक झाली आहे, हे निश्चित आहे. आजच्याच दिवशी 2001 मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा पोलिस आणि सैनिकांनी प्राणांची अहुती देऊन संसदेचे रक्षण केले होते.
काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम म्हणाले, अचानक 20-22 वर्षांचे दोन युवक प्रेक्षक गॅलरीमधून उडी मारत सभागृहात घुसले. त्यांच्या हातात काही वस्तू होती, त्यातून पिवळा धूर निघायला लागला. त्यातील एकाचा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न होता. काही घोषणाही हे युवक देत होते. त्यांनी फोडलेल्या स्मोक कँडलमधील धूर हा विषारीही असण्याची शक्यता होती. त्यामुळे सभागृहातील सदस्यांच्या जीविताला धोका होण्याची भीती होती. संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाली आहे.
लोकसभेत कामकाजावेळी प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहामध्ये घुसलेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला दिली. दोन जणांनी सभागृहात घुसखोरी केल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजतापर्यंत तहकूब करण्यात आले होते. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर बिर्ला यांनी चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली. ओम बिर्ला म्हणाले, सभागृहात घुसखोरी केलेल्या दोन जणांना आणि संसद परिसरात निदर्शने करणारे दोन जण असे चार जणांना आणि त्यांच्याकडील सामग्रीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी झाल्यानंतर, सविस्तर माहिती हाती आल्यानंतर या चौघांचा नेमका काय उद्देश होता, ते सभागृहाच्या पटलावर ठेवले जाईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times