Breaking News
रोहा : शहरातून बारमाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीत मैलामिश्रित प्रदूषित पाणी नाल्याद्वारे थेट सोडले जात आहे. यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली आहे. ही गंभीर बाब वारंवार निदर्शनास आणूनही प्रदूषण मंडळ आणि नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी, नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी रोह्यात सह्यांची मोहीम सुरू केली आहे. कुंडलिका नदी बचाव समितीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप वडके यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च करून रोह्यात कुंडलिका नदी संवर्धन योजना आणली; परंतु शहरातील मैलामिश्रित सांडपाणी नदीमध्ये सोडले जात आहे. परिणामी, कुंडलिका नदीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाल्याचे पाणी काळेकुट्ट असते. त्यामध्ये विविध प्रकारची घाण साचलेली असते आणि तेच पाणी नदीत सोडले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि कुंडलिका नदी बचाव समितीचे संस्थापक दिलीप वडके यांनी ठोस पुरावे देत नदी प्रदूषणाचा प्रश्न समोर आणला आहे. यासाठी सरकारकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून वडके यांनी नदी प्रदूषणाबाबत त्यांचा पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. रोहा शहर आणि आसपासच्या परिसरातील नागरी वसाहतीमधील सांडपाणी गटारामार्गे आजही सोडले जात आहे. नदीत सोडणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करणे आवश्यक असताना नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे वडके यांनी स्पष्ट केले.
प्रदूषण मंडळाच्या सूचनेकडे दुर्लक्ष
मानवनिर्मित सुरू असलेल्या प्रदूषणाविषयी प्रदूषण मंडळाने रोहा नगरपालिकेला पत्राद्वारे तातडीने कारवाई करण्याची सूचना केली होती; मात्र रोहा अष्टमी नगरपालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कुंडलिका नदीचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे.
पाण्याचा वापर
नदीचे पाणी पूर्ववत करावे; जेणेकरून ग्रामस्थांना इतर कामांसाठी योजना तयार करून पाणी वापरात आणता येईल. नुकतेच रोहा शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. असा प्रसंग नेहमीच येत असतो. अशा वेळी नदीचे बारमाही वाहणारे पाणी वापरात येऊ शकते. परंतु, प्रदूषणामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यासाठी रोहा अष्टमी नगरपालिकेला सर्व नागरिकांच्या सहीने नोटीस बजावण्याच्या कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिलीप वडके यांनी दिली आहे.
काही तांत्रिक कारणामुळे नगरपालिकेची भुयारी गटार योजना रखडली आहे. ती पुनर्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रामार्फत सांडपाण्यावर प्रक्रिया करून सोडले जाईल. त्यासाठी थोडा अवधी लागणार असून, नदी प्रदूषणाबाबत तात्पुरती स्वरूपात दुसरी उपाययोजना शक्य नाही.
- पंकज भुसे, मुख्याधिकारी, रोहा नगर परिषद
रोहा शहराचे मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याने ती प्रदूषित झाली आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली आहे. नाल्यामधून नदीत मिसळणारे पाणी प्रक्रिया करून सोडावे, असा नियम आहे. वारंवार निदर्शनास आणूनही रोहा नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
- दिलीप वडके, संस्थापक, कुंडलिका नदी बचाव समिती
नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही.
- नितीन परब, अध्यक्ष, रोहा सिटीझन फोरम
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
ROHAN RASAL