Breaking News
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत विजयी सलामी दिली. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. हा सामना विशाखापटणम येथे खेळवण्यात आला होता.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले. भारताने ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान शेवटच्या चेंडूवर २ गडी राखून गाठले. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४२ चेंडूमध्ये ८०, इशान किशन ३९ चेंडूमध्ये ५८ धावा आणि रिंकू सिंगने १४ चेंडूमध्ये २२ धावांचे योगदाने दिले. तर ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघा याने २ तर सियन अॅबॉट, मॅथ्यू शॉर्ट आणि जेसन बेहरनड्रॉपने प्रत्येकी १ विकेट पटकावली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शानदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूत 110 धावा केल्या. यामध्ये त्याने 11 चौकार आणि आठ षटकार मारले. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. स्मिथने 52 धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 13 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद सात धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर स्टिव्ह स्मिथ रन-आऊट बाद झाला.
शेवटच्या चेंडूवर एक धाव आवश्यक होती. रिंकू स्ट्राइकवर होता. तो बाद झाला असता किंवा धावा करू शकला नसता, तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता, पण तसे झाले नाही. सीन अॅबॉटच्या चेंडूवर रिंकूने षटकार ठोकला. दुर्दैवाने त्या सहा धावा रिंकूच्या खात्यात जमा झाले नाहीत. कारण अॅबॉटचा पाय रेषेच्या बाहेर गेला होता आणि पंचांनी तो नो-बॉल घोषित केला. अशा परिस्थितीत भारताच्या खात्यात षटकार ऐवजी एक धाव जमा झाली आणि टीम इंडियाने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. रिंकू सिंगने १४ चेंडूत २२ धावा केल्यानंतर नाबाद परतला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times