Breaking News
मराठा आरक्षणाची मागणी आता जोर धरु लागली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. तर बुधवारी रात्री ९ वाजल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाणी घेणं बंद केलं आहे.
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गुरुवारी राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जालन्याच्या आंतरवाली सराटी इथं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या शिष्टमंडळासोबत नेमके कोणते मंत्री जाणार? याबाबत स्पष्टता नाहीये. तर शिष्टमंडळासोबत राज्याचे सचिवदेखील जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली. कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन पुन्हा मनोज जरांगे यांच्याशी बातचित केली. गुरुवारी शिष्टमंडळ भेटीसाठी येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं बच्चू कडूंनी जरांगेंना सांगितलं.
मनोज जरांगे यांनी पाणी बंद केलं असून सरकारसोबत आता उद्या शेवटची चर्चा होईल, असं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी जरांगेंनी लावून धरलेली आहे.
दुसरीकडे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय मंगळवारी सरकारने घेतला. पुराव्यांचा अभ्यास करुन मराठवाड्यातील मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यात येत असले तरी ज्या युवकाने पहिलं प्रमाणपत्र घेतलं होतं, त्याने त्याची होळी करुन सरकारचा निषेध केला आहे.
मनोज जरांगे यांनी सरकारसोबत ही शेवटची चर्चा होईल, असं स्पष्ट करुन कायमचा तोडगा काढण्याची मागणी केलीय. गुरुवारी जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नेमके कोणते मंत्री असणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times