Breaking News
जालना : मराठा आरक्षणाबाबत राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी दोन अतिशय मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र सरकारने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत आज रात्री किंवा उद्या दिवसभरात ठोस निर्णय नाही घेतला तर, उद्या संध्याकाळपासून मी पुन्हा पाणी बंद करणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने आज जे निर्णय घेतले, त्यातला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्ही सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सकाळी स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्ही सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या. मात्र माझ्या माहितीत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमुर्ती शिंदेंच्या समितीला राज्याचा दर्जा द्यावा आणि जो प्रथम अहवाल तयार झाला आहे, त्यामार्फत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. जर तुम्ही मराठा आरक्षणाबाबत आज रात्री किंवा उद्या दिवसभरात ठोस निर्णय नाही घेतला तर, उद्या संध्याकाळपासून पुन्हा मी पाणी बंद करणार आहे. सगळी जबाबदारी सरकारची असेल, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र शांत आहे, पण महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही, असा सरकारचा अंदाज आहे. त्याला आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जाणून बुजून मराठ्यावर आणि त्यांच्या जातींवर वर्षानुवर्षे अन्याय करत आहात. तुम्हाला आणखी अन्याय करायचा आहे, पण आता आम्ही अन्याय सहन करणार नाही. जर तुम्ही आज रात्री आणि उद्या विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश केला नाही, तर उद्या संध्याकाळपासून मी पाणी बंद करणार आहे, याची सरकारने नोंद घ्यावी, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times