Breaking News
नवी दिल्ली, 31 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा देश‘ या मोहिमेत सुमारे सहा लाख गावांमधून अमृत कलशामध्ये आणलेली माती विशाल अमृत कलशात (भारत कलश) संग्रहित करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशी वनस्पतीं अमृत वाटिकेमध्ये समारंभपूर्वक आज स्थापित करण्यात आली.
राजधानीतील कर्तव्य पथ येथे सांगता समारंभ सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सांस्कृतिक कार्यमंत्री जी.किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल व मीनाक्षी लेखी, केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, युवा व क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक उपस्थित होते.
विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून अमृत कलश घेऊन आलेल्या लोकांमध्ये मोठा उत्साह होता, तर संपूर्ण कर्तव्य पथही देशभरातून येणाऱ्या मातीच्या सुगंधाने यावेळी दरवळून गेला होता.
या समारोप सोहळ्यासाठी राजधानीत सहभागी होण्याकरिता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रोजी अमृत कलश यात्रा विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून, राज्यातून 414 कलश घेऊन जाणा-या 881 स्वयंसेवकांना रवाना केले होते. शनिवारी दिल्लीत दाखल झालेल्या विशेष रेल्वेतून आगमन झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार व दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने स्वागत व सत्कार केला. यावेळी दिल्लीस्थित मराठी बांधव उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आज कर्तव्य पथावर ठेवण्यात आलेल्या भारत कलशला नमन केले. येथे बांधण्यात आलेल्या मुख्य अमृत वाटिकेचे उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात ‘मेरी माती मेरा देश’ या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रमात देशभरात एकतेचा संदेशही देण्यात आला. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून अमृत कलशात माती घेऊन येणाऱ्या लोकांनी कर्तव्य पथावर देशाच्या माती आणि स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या वीरांना यावेळी आदरांजली वाहिली.
२.६३ लाखांहून अधिक ठिकाणी अमृत वाटिका देशभरात
या मोहिमेअंतर्गत शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,33,000 शिळाफलक उभारण्यात आले आहेत. तसेच संबंधित संकेतस्थळावर पंच निर्धारांच्या प्रतिज्ञेसह सुमारे 40 दशलक्ष सेल्फी फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीतून, देशभरातील शूरवीरांचा गौरव करण्यासाठी 200,000 हून अधिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. वसुधा वंदन संकल्पनेअंतर्गत 236 दशलक्षांहून अधिक स्वदेशी रोपट्यांची लागवड करण्यात आली असून 263,000 अमृत वाटिका उभारण्यात आल्या आहेत.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी देशाच्या विविध भागातून अमृत कलश घेऊन कर्तव्य पथावर जमलेल्या स्वंयसेवकांना संबोधित कले. मेरी माटी मेरा देश‘ अभियानाने तरुणांना विविधतेत एकतेचा संदेश दिला आणि तरुणांनी देशाच्या विकासात आपला सहभाग वाढवाण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी ‘मेरा युवा भारत प्लॅटफॉर्म‘ ही लॉन्च केले. या प्लॅटफॉर्मव्दारे युवक सहभागी होऊन देशाच्या विकासात हातभार लाऊ शकतील.
या समारंभाची उत्कृष्ट विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्ताकर्षक प्रकाश आणि ध्वनीच्या संगीताचा कार्यक्रमाने सांगता झाली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times