Breaking News
बीड : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी आधी दगडफेक तर नंतर त्यांच्या घरासमोरील वाहने जाळून टाकली. एवढेच नव्हे तर त्यांचा बंगलाच जळत असल्याचे सध्याचे चित्र आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या प्रकरणावर भाष्य केले.
राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांची दगडफेक करण्यात आली आहे. मनोज जरांगेंच्या संदर्भात सोळंकेंनी रविवारी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा भडका उडाला आहे.
सोमवारी (30 ऑक्टोबर) रोजी मराठा आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर हल्ला केला. मागील एक तासापासून दगडफेक सुरूअसून, काही आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंकेच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिले आहे, वाहनांना लागलेली आग आता त्यांच्या बंगल्यापर्यंतही जाऊन पोहचली आहे.
या घटनेनंतर आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मराठा समाजाला हा हिंसाचार रोखण्यासाठी विनंती केली आहे. माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. मीसुद्धा मराठा समाजाचाच आमदार आहे. काहीजण अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला, गाड्यांची जाळपोळ झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आंदोलन भरकटत चालेल आहे याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमने घेतली पाहिजे. आत्महत्या का होत आहे, त्यामागे कोण आहे? हे तपासलं पाहिजे. आपापासात संघर्ष होऊ लागला तर मराठा समाजाबद्दल असलेली सहानुभूती कमी होऊ शकते. मराठा समाजाचे जे मोर्चे निघाले ते शांततेने निघाले. आता त्याला गालबोट लावण्याचे काम कोण करत आहे त्याचा विचार आंदोलकांनी केला पाहिजे. मराठा समाजाला काय-काय देतोय ते आम्ही जाहिरातीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times