Breaking News
पुणे – राज्यातील मराठा समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशातच आज पुणे शहरातील अलका टाॅकीज चौक येथे राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा समाज आंदोलकांनी केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच यावेळी ‘शरद पवार गो बॅक’ असे बॅनर हातात घेतले होते. ते पोस्टर दाखवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी तत्परता दाखवत पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. पण या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार टिकळ स्मारक मंदिरातील सभा आटोपून आपल्या निवासस्थानाकडे निघाले असताना अलका टाॅकीज चौकात ताफा अडवण्याची ही घटना घडली आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपूर्वी उपोषण केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. सदर वेळेत जर प्रश्न निकाली लागला नाही तर पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हंटले होते. त्यानुसार आज दिलेली 40 दिवसांची मुदत संपत असून उद्यापासून जरांगे उपोषणाला बसण्याची शक्यता आहे.
तसेच अंतरवाली सराटी गावात लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जीआर घेऊनच गावात यावे असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेकडो गावात लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी करण्यात आली असून त्यांचे ताफे अडविले जात आहेत. असाच प्रयत्न शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा झाला.
दुसरीकडे आज लातूर जिल्ह्यात लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार धीरज देशमुख यांचा ताफा मराठा समाजाकडून अडवण्यात आला. त्यांनी विभानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला नसल्याचा आरोप करत त्यांचा ताफा अडवून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच लातूर जिल्ह्यातील वाढवणा येथे उदगीर मतदार संघाचे आमदार कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचाही ताफा अडवून घोषणाबाजी करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times