Breaking News
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणारे नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमावर होणारा सुमारे १२ कोटी खर्च आणखी वाढण्याची आणि त्याचा भार सिडको, महा मेट्रोवर येण्याची शक्यता आहे. (Inauguration of Navi Mumbai Metro will be postponed for the fourth time date by date from PM Modi)
सिडको व्यवस्थापनाने नवी मुंबई मेट्रो व नमो महिला सशक्तीकरण मोहिमेच्या कार्यक्रमासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर एक लाख महिला उपस्थित राहतील, असे गृहित धरून आवश्यक मंडप उभारणी व इतर सोयीसुविधा पुरविण्याकरीता किमान पाच कोटी खर्च अपेक्षित धरून निविदाही काढल्या आहेत. परंतु, पंतप्रधानांचा 30 ऑक्टोबरचा संभाव्य दौरा पुढे ढकलण्यात आल्याची धक्कादायक माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे राज्य सरकारसह सिडको व रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी हवालदिल आहेत. दरम्यान, आता ऐन दिवाळीत पंतप्रधानांनी नवी मुंबईचा दौरा आखू नये, अशी मनोमन प्रार्थना प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी एक दिवसाच्या कार्यक्रमावर एकूण 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. दरम्यान, पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलल्याची माहिती मिळताच सुरू करण्यात आलेले मैदानाचे काम थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी मुंबई मेट्रोचा 30 नोव्हेंबरचा कार्यक्रम लांबणीवर पडला असला तरी काही तासांच्या या कार्यक्रमासाठी सुमारे 6 लाख चौरस फुटांचे मैदान विकसित करण्यासाठी सिडको तब्बल 8 कोटी 16 लाख रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सिडकोकडून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला या व्यतिरिक्त पाच कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. सहा लाख चौरस फुटांचा जर्मन हँगर प्रकारचा भव्य मंडप उभारणी ते मंडपात कुलर, वातानुकूलन यंत्रणेचे नियोजन केले जाणार आहे. एवढ्यावरच न थांबता सिडकोकडून याच कार्यक्रमासाठी याव्यतिरिक्त आणखी 8 कोटी 16 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू असलेल्या जागेत कार्यक्रमासाठी सिडकोला मैदान उभे करावे लागणार आहे. या जागेवर दगडी भराव असल्यामुळे मातीचा भराव टाकून मैदान तयार करावे लागणार आहे. त्यासाठी 2 कोटी 50 लाख 49 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रभरातून येणाºया अडीच हजार बसेस व पाच हजार लहान वाहनांसाठी पार्किंगसाठी मैदान (2 कोटी 46 लाख 28 हजार रुपये) आणि तिसऱ्या टप्प्यात मैदानाचे प्रवेशमार्ग आणि स्टेजच्या मागील रस्ता विकसित करण्यासाठी तब्बल 3 कोटी 20 लाख 4 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. विमानतळाचे काम पाहणाऱ्या अधीक्षक अभियंता कार्यालयाने या कामांच्या निविदा मागील तीन दिवसांत प्रसिद्ध केल्या आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times