आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय
मुंबई, दि. १८ : परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
दरम्यान, आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. १६६ मोटार वाहन निरिक्षकांपैकी ९१ टक्के जणांना तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली आहे.
परिवहन विभागातील बदल्या माध्यमांमध्ये, विधीमंडळाच्या अधिवेशनांमध्ये चर्चेत असायच्या त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बदल्यांची कार्यवाही पारदर्शकपणे आणि संगणीकृत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विभागाने ही प्रणाली विकसीत केली असून त्याचे सादरीकरण विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी बैठकीत केले. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अतिरीक्त आयुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
परिवहन विभागाच्या काही विभागातील कार्यालांमध्ये निरीक्षक आणि सहायक निरीक्षक ही पदे रिक्त होती. आता या प्रणालीच्या माध्यमातून राज्यभर सर्वत्र समप्रमाणात पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र अधिकाऱ्यांकडून तीन पसंती क्रमाचे ठिकाण ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. त्यानुसार यावर्षी बदलीपात्र अधिकाऱ्यांमध्ये १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश होता. त्यांची ऑनलाईन पद्धतीने अंतिम यादी आजच्या या बैठकीत तयार करण्यात आली.
१६६ मोटार वाहन निरीक्षकांपैकी १०० जणांना प्रथम पसंती क्रमानुसार, ३५ जणांना द्वितीय पसंती क्रमानुसार, १५ जणांना तृतीय पसंती क्रमानुसार तर १६ जणांना रॅण्डमली बदली देण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times