Breaking News
मुंबई, दि. १६ : पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले.
पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. भावी पिढीने देखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वाड्यातील भाडेकरूंनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली होती. त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता खंडाळा)येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्व बाबींची पूर्तता करून स्मारकाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल -उपमुख्यमंत्री अजित पवार
महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळत ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. ऐन नवरात्रोत्सवातच न्यायालयाने हा निकाल दिल्याने महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला खऱ्या अर्थाने बळकटी मिळणार असून भिडे वाड्यात उभारण्यात येणारे राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा, प्रोत्साहन, बळ देईल, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरु करुन महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळे देशाला महिला शिक्षणाचा विचार व दिशा मिळाली. ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु झाली, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याची राज्य सरकारची अनेक वर्षापासूनची योजना होती. त्या जागेबाबत तेथील पोटभाडेकरुने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे या स्मारकाचे काम रखडले होते. गेल्या अनेक वर्षापासून या न्यायालयीन लढ्यात अनेक जण सक्रीय सहभागी होते, या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठीच्या लढ्याचा मी देखील साक्षीदार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पोटभाडेकरुची याचीका फेटाळून ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे भिडे वाड्यात उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी फुले दाम्पत्याच्या कार्याला साजेसे भव्य राष्ट्रीय स्मारक राज्य सरकारच्यावतीने उभारले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times