Breaking News
महाराष्ट्र संघाची विजयी घोडदौड
कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेतील लिग सामन्यात महाराष्ट्र संघाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. रविवारी झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने लक्षद्वीप संघावर ४-० गोलने एकतर्फी विजय मिळवला. सलग दुसऱ्या विजयासह महाराष्ट्रने ६ गुणांसह आघाडी घेतली. तेलंगणा विरूध्द आंध्रप्रदेश तसेच अंदमान आणि निकोबार विरूध्द त्रिपुरा हे दोन्ही सामने गोलशून्य बरोबरीत राहिले.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजीत ७७ वी हिरो मेन्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीप फॉर संतोष ट्रॉफीच्या ग्रुप-एफ मधील लिग सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत. रविवारी महाराष्ट्र आणि लक्षद्वीप यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पूर्वार्धात अद्वैत याने ९व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली.
१-० गोलच्या आघाडीवर उत्तरार्धात महाराष्ट्र संघाने वेगवान खेळ केला. अर्माश नसिर अन्सारीने ५९व्या मिनिटाला गोल करून आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर कर्णधार निखिल कदमने ६८व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी ३-० अशी भक्कम केली. हिमांशू पाटीलने ७८व्या मिनिटास गोल नोंदवून संघाला ४-० अशा आघाडीवर नेले. अखेर उर्वरित वेळेत ४-० गोलची आघाडी राखत महाराष्ट्र संघाने विजयावर शिक्कामोर्तब केले. लक्षद्वीप संघाला पूर्णवेळेत एकाही गोलची परतफेड करता आली नाही. पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळ करून एकतर्फी विजय मिळवला.
दोन सामने बरोबरीत.....
तेलंगणा विरूध्द आंध्रप्रदेश त्याचप्रमाणे अंदमान आणि निकोबार विरूध्द त्रिपुरा हे झालेले दोन्ही सामने गोलशून्य बरोबरीत राहिले. सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने प्रत्येक संघाला एक गुण मिळाला.
त्रिपुरा विरूध्द अंदमान आणि निकोबार सामन्यादरम्यान त्रिपुरा संघाचा खेळाडू भक्ती जमातिया याला नियमबाह्य खेळाबद्दल दोनदा यलो कार्ड दाखविण्यात आले. दोन यलो कार्ड मिळाल्याने अखेर मुख्यपंचानी त्यास रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले. स्पर्धेतील हे पहिले रेडकार्ड ठरले.
मंगळवारी होणारे सामने.....
• लक्षद्वीप - अंदमान निकोबार : स. ८:३०
• त्रिपुरा - तेलंगणा : सकाळी ११:३०
• महाराष्ट्र - आंध्रप्रदेश : दुपारी ३:३०
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times