Breaking News
बोईसर : वाढवण बंदर रद्द करण्याच्या प्रमुख मागणी सह इतर अनेक मागण्यांसाठी आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर जवळील जव्हार फाटा येथे आदिवासी संघटनांच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी जवळपास एक तास महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात आदिवासी एकता परिषद व भुमिसेना या आदिवासी संघटनांचे जवळपास एक हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा यावेळी भूमिसेनेचे संस्थापक अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी दिला. या आंदोलनाला महविकास आघाडी मधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता.
हेही वाचा >>> भरपावसात ‘जयभीम’चा नारा;
पालघर जिल्ह्यातील महाकाय वाढवण बंदराला डहाणू तालुका संरक्षण प्राधिकरणाने ना हरकत दाखला दिल्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार, शेतकरी, बागायतदार यांच्यामध्ये सरकारविरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला जात आहे. वाढवण बंदराविरोधात जिल्ह्यातील वातावरण अधिकच तापू लागले असून विरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. आदिवासी एकता परिषद व भूमी सेना या संघटनांच्या वतीने मनोर जवळील जव्हार फाटा येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जवळपास एक तास रोखून धरण्यात आला.
कडाकाच्या उन्हात हजारभर महीला पुरुष कार्यकर्त्यांनी महामार्गावर बसकन मारत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात खासदार राजेंद्र गावित सहभागी होऊन त्यांनी बंदर विरोधी भूमीकेला पाठिंबा दर्शवला. लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असल्याचे सांगितल्याने मोर्चेकरांची भेट घेण्यासाठी व त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी आपण गेल्याचा खुलासा खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे.
• वाढवण बंदर कायमचे रद्द करा.
• धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊ नये.
• राज्य सरकारने कंत्राटी भारतीय संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा.
• सरकारी शाळांचे खाजगीकरण बंद करावे.
• मनोर येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे.
• मनोर- जव्हार फाटा येथील उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करावे.
• पेसा भरतीची संपूर्ण अंमलबजावणी करावी.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times