Breaking News
वॉशिंग्टन - भारतीय संविधान निर्माते , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटी या नावाने 19 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारत आणि अमेरिकन नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं यावेळी, उपस्थितांनी म्हटलं. विशेष म्हणजे भरपावसात पुतळा अनावरणासाठी नागरिकांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केलं. यासाठी अमेरिकेच्या विविध भागांतून 500 हून अधिक भारतीय व अमेरिकन नागरिक उपस्थित होते. यावेळी जय भीमचा जयघोषही करण्यात आला.
अमेरिकेतील हा पुतळा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेर उभा करण्यात आलेला सर्वात उंच पुतळा आहे. भर पावसातही भारतीय नागरिक या कार्यक्रमासाठी उत्साहाने आले होते. काहीजण 10 तासांचा प्रवास करुन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा बनवणार्या प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांनीच हा पुतळा बनवला आहे.
आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर द्वारा स्टॅच्यू ऑफ इक्वलिटीची स्थापना मॅरिलँडच्या एक्कोकीक येथील 13 एकर जागेवर करण्यात आली आहे. येथील उद्यानास बी. आर.आंबेडकर स्मृति पार्क असं नावही देण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी भारतासह संयुक्त राज्य अमेरिकेतील नामवंत पाहुणे उपस्थित होते. अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जात असल्याने आजचा क्षण 140 कोटी भारतीय आणि 45 लाख अमेरिकन भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं दिलीप म्हस्के यांनी म्हटलं. तसेच, हा पुतळा या सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करत आहे, असेही ते म्हणाले. दिलीप म्हस्के हे अमेरिकेतील आंबेडकरवादी आंदोलनाचे नेतृत्व करतात.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
Suhas Kamble