Breaking News
कवितांच्या रंगभूमीवरच्या अनोख्या नाट्याविष्काराला रसिकांची दाद
कणकवली (गुरुदत्त वाकदेकर) : मालवणी बोलीत असलेली आभाळाला आणि काळजाला साद घालण्याची ताकद ज्यावेळी रंगमंचावर सादर होते त्यावेळी त्यातला प्रगल्भपणा हा खऱ्या अर्थाने देहाला आणि मनाला संपृक्त करतो. रंगमंचावर नव्याने दाखल झालेली 'भावबंध कोकणचे' ही कलाकृती त्याचाच उत्कट प्रत्यय आहे.
'भावबंध कोकणचे' या डॉ. सई लळीत यांच्या कवितांच्या नाट्याविष्कार कार्यक्रमात वांगड, लास्टो पावस्, शबय, सोरगत, चाकरमानी अशा कवितांमधील भावबंध अनुभवताना रसिकांचे डोळे पाणावले. कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेने निर्मिती केलेल्या 'भावबंध कोकणचे' या डॉ. सई लळीत यांच्या कवितांच्या नाट्याविष्कार कार्यक्रमाची संकल्पनाच अफाट आहे. या कार्यक्रमाचे काव्यलेखन, संहितालेखन, निवेदन आणि दिग्दर्शन डॉ. सई लळीत यांनी केले. रंगमंचावर एका बाजुला त्या स्वत:च्या मालवणी कवितांचे अभिवाचन करीत असताना त्याचवेळी कलाकारांनी त्या कवितांचा आशय अभिनयाद्वारे रंगमंचावर सादर केला. एकाचवेळी कवितांचे वाचन आणि त्यांचा रंगमंचीय आविष्कार होत असताना पडद्यावर अनुरुप छायाचित्रांचे दर्शनही घडविण्यात येत होते.कवितांच्या या दृश्य आविष्काराचा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांनी उचलून घेतला व प्रत्येक सादरीकरणाच्या शेवटी टाळ्यांच्या प्रचंड प्रतिसादात दाद मिळत होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'चाकरमानी' ही कविता सादर झाली. चाकरमान्याच्या प्रतिक्षेत असणारी त्याची बहीण, आईवडील यांची तो येण्याची उत्सुकता आणि मुंबईला परतताना होणारी घालमेल याचे उत्कृष्ट दर्शन या कवितेतून घडविण्यात आले. निलेश पवार, अभय खडपकर, सुप्रिया प्रभुमिराशी, अदिती लळीत, सत्यवान गावकर यांनी ही कविता अभिनित केली. यानंतर सोरगत (मंगल राणे), बाशिंगबळ (श्रेयश शिंदे, प्रियांका मुसळे), हंड्रेड पर्सेन्ट (मंगल राणे, निलेश पवार), आज घरवाले येतले (श्रीया शिंदे), मऊसा चान्ना पडांदे (प्रियांका मुसळे), चालता हो (निलेश पवार, मंगल राणे), हाली ना माका हेंची खुप दया येता (कांचन खानोलकर, अभय खडपकर) या कविता सादर झाल्या आणि हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. दशावतारी नाटकातील राक्षसपार्टी सादर करणाऱ्या कलावंताचे मनोगत व्यक्त करणारी व राजकारणातील सद्यस्थितीचे भेसूर दर्शन घडवणारी 'गोडो राक्षस' ही कविता शरद सावंत यांनी राक्षसाच्या वेशभुषेत अप्रतिमपणे सादर केली. मी केवळ राक्षसाचे काम करणारा एक साधासुधा नट आहे, खरे भेसुर राक्षस समाजात कसे वावरत आहेत, याचे दर्शन घडविणारी ही कविता प्रेक्षकांना अंर्तमुख करुन गेली. 'शबय' या अतिशय तरल कवितेमधुन शिमग्यातील 'राधा' बनून मुद्दामच आपल्या प्रेयसीच्या (आता विवाहीत) दारात येणारा प्रियकर राकेश काणेकर या उमद्या कलाकाराने रंगवला. त्याने 'राधे'च्या स्त्रीवेशात सादर केलेली ही कविता प्रेक्षकांनी उचलून घेतली.
मुंबईत रमलेल्या व आताशा गावी न येणाऱ्या आपल्या मुलाची वाट पाहणारी, त्यानेच दहा वर्षांपुर्वी दिलेल्या स्वेटरच्या 'वांगडा'ने मुलखात एकटी दिवस कंठणारी एकाकी वृद्ध आई सुप्रिया प्रभुमिराशी यांनी समर्थपणे साकारली. तिचा एकाकीपणा, विवशता आणि दु:ख पाहून रसिक हेलावले. आयुष्याच्या उतारावर असलेला आणि यंदाचा पाऊस हा कदाचित शेवटचा असेल का, असा विचार करणारा वृद्ध अभय खडपकर यांनी 'लास्टो पावस्' या कवितेद्वारे कसदार अभिनयाने प्रत्यक्ष साकारला. हा पाऊस जर शेवटचाच असेल ती नवी छत्री घेऊ की नको, असे म्हणतानाची त्याची घालमेल रसिकांना अस्वस्थ करुन गेली.
सत्यवान गावकर याने साकारलेला आणि प्रत्येक गावात दिसणारा 'बाबी' रसिकांच्या पसंतीला उतरला. गावातील प्रत्येकाला अडीनडीच्या प्रसंगी जमेल तशी मदत करणाऱ्या मालवणी कॉमन मॅन 'बाबी'ची भुमिका त्याने जिवंत केली. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन, निर्मिती आणि छायाचित्रांचे सादरीकरण सतीश लळीत यांनी केले. पखवाजाची साथ अनीश ठाकुर याने दिली. राकेश काणेकर यांची वेशभूषा प्रशांत ठाकूर आणि भाग्यश्री मांजरेकर यांनी, तर राक्षसाची रंगभुषा दशावतारी कलावंत नारायण आईर यांनी केली. ध्वनीयंत्रणा डंबे बंधु यांनी, तर प्रकाशयोजना हृषिकेश कोरडे यांनी सांभाळली. मालवणी बोलीत मूलतः एक काव्यमयता आहे, इथल्या बोलीतल्या सुरात जशी जाणवते तशीच ती सहज साध्या संवादातही जाणवत राहते. डॉ. सई लळीत यांनी 'भावबंध कोकणचे' या काव्यात्मक नाट्याविष्कार माध्यमातून बोलीतला हा सशक्त प्रकार रंगमंचावर आणण्याचे धाडस केले आहे, त्यासाठी रसिकांनी त्यांचे कौतुक केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times