Breaking News
नवी मुंबई ः ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ओडीएफ कॅटेगरीमध्ये ओडीएफ डबल प्लसच्या पुढील सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस जाहीर झाले आहे. वॉटरप्लस मानांकन संपादन करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये देशातील तृतीय व महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ ला सामोर जाताना ‘निश्चय केला- नंबर पहिला’ हे ध्येय निश्चित करून नवी मुंबईकर नागरिकांच्या सहयोगाने महानगरपालिका सर्वेक्षणाला सामोरी गेली आहे. यामध्ये हागणदारीमुक्त शहरांच्या (ओडीएफ सिटी) श्रेणीमध्ये सर्वोच्च असणारे वॉटरप्लस हे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारमार्फत जाहीर झाले असून सर्वोच्च ‘वॉटरप्लस मानांकन’ मिळविणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव व देशातील 4 शहरांमधील एक शहर आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ चे सर्वेक्षण करताना ओडीएफ कॅटॅगरीमध्ये स्वच्छता विषयक विविध बाबींची केंद्रीय पथकामार्फत बारकाईने पाहणी करण्यात आली होती. स्थानिक प्रशासनास कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षणाची कार्यपध्दती अवलंबली जात असल्याने परीक्षण पथकाने शहरातील विविध भागांची तपासणी केली. यामध्ये दैनंदिन निर्माण होणार्या सांडपाण्यावर करण्यात येणार्या प्रक्रियेच्या तपासणीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शहरात दररोज निर्माण होणार्या 100 टक्के म्हणजेच 380 द.ल.लि. सांडपाण्यावर अत्याधुनिक सीटेक तंत्रज्ञानावर आधारीत 7 मलप्रक्रिया केंद्राव्दारे प्रक्रिया करीत असून या मलप्रक्रिया केंद्रांची क्षमता सध्याच्या सांडपाण्याच्या तुलनेत 40 टक्के अधिक आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात मलनि:स्सारण वाहिन्यांचे जाळेही 95 टक्के इतके इतर शहरांच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याचा बीओडी 5 पेक्षा कमी असून हे प्रक्रियाकृत चांगल्या दर्जाचे पाणी उद्यानांमधील हिरवळ व झाडे फुलविण्यासाठी तसेच रस्ते, दुभाजक व पदपथ स्वच्छ करण्यासाठी त्याचप्रमाणे एनआरआय सारख्या संकुलांना पिण्याव्यतिरीक्त पाण्याच्या वापरासाठी दिले जात आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाले स्वच्छ रहावे याकरिता वार्षिक नालेसफाई करण्याप्रमाणेच नाल्यामध्ये नागरिकांकडून कचरा टाकला जाऊ नये याकरिता नाल्यांवरील पुलांच्या काठांवर उंच जाळ्या लावण्यात आल्या असून नाल्यांमध्येही स्क्रीन लावून कचरा अडवला जात आहे व त्याची नियमित सफाई केली जात आहे. शहरामध्ये काही ठिकाणी असलेल्या सेप्टीक टँकची सफाई अत्याधुनिक वाहनांव्दारे केली जात असून त्यातील स्लज सफाईनंतर लगेचच मलप्रक्रिया केंद्रात पुढील प्रक्रीयेसाठी घेऊन जाण्याची नियमित प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेस ओडीएफ डबल प्लस हे मानांकन यापूर्वीच प्राप्त झाले असून शहर हागणदारीमुक्त रहावे याकरिता महानगरपालिका अत्यंत दक्ष आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times