Breaking News
कोरोनाकाळात मध्यमवर्गीय आण गरीबांचं उत्पन्न घटलं असताना अब्जाधीशांची संख्या मात्र वाढत आहे. गरीब आणि श्रीमंतांमधली दरी या काळात वाढल्याचं आकडेवारीनिशी सिध्द करता येत आहे. याबाबत केंद्र सरकार आणि हुरुन ग्लोबल रिचच्या आकडेवारीत मोठी तफावत असली, तरी केंद्र सरकारनेच संपत्ती कर रद्द केल्यामुळे कोणाची संपत्ती किती वाढली, हे सांगता येत नाही, असं म्हटलं आहे. भारतात शंभर कोटी किंवा त्यापेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. 2020-21 मध्ये अशा व्यक्तींची संख्या 136 होती. 2019-20 मध्ये त्यांची संख्या 141 तर 2018-19 मध्ये 77 होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकर विभागाकडे दाखल झालेल्या तीन वर्षांच्या विवरणपत्रातून ही माहिती पुढे आल्याचं राज्यसभेत सांगितलं.
देशातल्या अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहे हे खरे आहे का, या प्रश्नावर अर्थमंत्र्यांनी सांगितलं की केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (सीबीडीटी) उपलब्ध माहितीनुसार प्रत्यक्ष करांतर्गत ट्रिलियनेअर’ या शब्दाची व्याख्याच उपलब्ध नाही. एप्रिल 2016 मध्ये संपत्ती कर रद्द करण्यात आला असल्याने सीबीडीटी यापुढे वैयक्तिक करदात्याच्या संपूर्ण संपत्तीबद्दल कोणतीही माहिती ठेवत नाही. कोरोना काळात जगभरासह भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना भारतीय अब्जाधीशांच्या संख्येत मात्र वाढ झालेली दिसते. हुरुन ग्लोबल रिच नुसार कोरोना काळात भारतात तब्बल 40 उद्योगपती अब्जाधीश क्लबमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे भारतात सध्या अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली असून ती 177 झाली आहे. भारत सरकार मात्र ही संख्या 136 च असल्याचं सांगतं. जवळपास 83 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेले रिलायन्सचे मुकेश अंबानी भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या वेळी जागतीक श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानी असलेले मुकेश अंबानी हे आता आठव्या स्थानी पोहचले आहेत. कोरोना काळात त्यांच्या संपत्तीत 24 टक्क्यांची वाढ झाली आहे.
हुरुन इंडियाचे एम. डी. आणि मुख्य संशोधक अनास रहमान जुनैदा यांच्या मते अमेरिका आणि चीनमध्ये संपत्तीची निर्मिती ही तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे तर भारतात यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. भारतात पारंपरिक किंवा सायकलिक बिझनेसच्या माध्यमातून संपत्तीची निर्मिती होताना दिसत आहे. हुरुन इंडियांच्या मते, भारतात तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्ण क्षमतेने संपत्तीची निर्मिती होईल, त्या वेळी भारत अब्जाधीशांच्या संख्येत अमेरिकेलाही मागे टाकेल. कोरोनाकाळात उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली असून त्यांची संपत्ती आता 32 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. याचबरोबत गौतम अदानी हे आता जगातल्या श्रीमंतांच्या यादीत 48 व्या स्थानावरून विसाव्या स्थानावर पोहोचले आहेत. ते आता भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर पोहचले आहेत. त्यांचे बंधू विनोद अदानी यांची संपत्ती कोरोनाकाळात 128 पटींनी वाढली असून 9.8 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. पतंजली आयुर्वेदचे आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत 32 टक्क्यांनी घट झाली असून ती 3.6 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. महिंद्रा ग्रुपच्या संपत्तीतही 100 टक्क्यांची वाढ झाली असून ती 2.4 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. महिला अब्जाधीशांचा विचार करता किरण मुजूमदार शॉ यांच्या संपत्तीत 41 टक्क्यांची वाढ झाली असून ती 4.8 अब्ज झाली आहे. तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्य्ररेषेखालील लोकांची संख्या 27 कोटी (21.9 टक्के) असल्याचा अंदाज होता. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की सरकारने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ वर भर देऊन विविध योजना सुरू केल्या आहेत, ज्याचा उद्देश लोकांचं जीवनमान सुधारणं आणि जलद सर्वसमावेशक वाढीकडे नेणं आहे. त्यांनी गरीबांची संख्या दिली नसली, तरी वेगवेगळ्या आकडेवारीनुसार भारतातल्या गरीबांची संख्या गेल्या दीड वर्षांमध्ये किमान 22 कोटींनी वाढली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times