Breaking News
नवी मुंबई : आपल्या पाल्याने खूप शिकावं, मोठे व्हावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र त्यांच्यावर जबरदस्ती न करता त्यांच्या कलाने घेऊन समजावले नाही तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा प्रत्यय ऐरोलीतील दुर्घटनेतून दिसून आला आहे. अभ्यासासाठी तगादा लावणार्या आईची मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मुलीने दहावीत 92 टक्के गुण प्राप्त केले होते. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, अशी आई वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तिला गेल्या मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावला होता. नीट परीक्षेच्या अभ्यासामध्ये मुलीने सातत्य ठेवावे यासाठी आई मुलीवर दबाव आणत होती. त्यामुळे मुलीचे आपल्या आईसोबत अभ्यासावरुन नेहमी भांडण होत होते. या वादात मुलीने आई वडीलांविरोधात पोलिसात तक्रार करण्याची धमकी देखील दिली. त्यामुळे आईने मुलीला रबाळे पोलीस ठाण्यात नेले होते. त्यावेळी रबाळे पोलिसांनी मुलीची आणि तिच्या आई-वडिलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवून दिले होते. त्यानंतर 30 जुलैला सकाळी या मुलीचे वडील घराबाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती, आई आणि लहान भाऊ होते. यावेळी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आईने पुन्हा आपल्या मुलीला अभ्यासावरुन रागावून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आईने हातात सुरी घेतल्याने मुलीला आईचा राग आला. त्यामुळे तीने जोरदार प्रतिकार केला. यावेळी आई आणि मुलगी या दोघींमध्ये झालेल्या झटापटीत आई खाली पडून तिच्या डोक्याला बेडरुममध्ये असलेल्या बेड लागला. त्यामुळे आई अर्धमेली होऊन पडल्यानंतर तिने बेडवर पडलेला कराटेचा कापडी बेल्ट आईच्या गळ्याभोवती घट्ट आवळला ज्यात तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे आईची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी मुलीने बेडरुमचा दरवाजा आतून बंद करुन आईच्या मोबाईल फोनवरुनच नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मुलीनेच आईचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पिढीमधील अंतराचा पालकांनी विचार करावा
पिढीमधील अंतराचा पालकांनी विचार केला पाहिजे. मुलाच्या भविष्याबाबत सतर्क असताना त्यांची आवड आणि क्षमता याचा विचार केला पाहिजे. आधुनिक युगातील मुलांचे भावविश्व समजून घेऊन त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्याच्या कलेने घेतले पाहिजे. जेणेकरुन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये दुरावा निर्माण होऊन असे गुन्हेगारी कृत्य घडेल याची सर्व पालकांनी खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times